व्यसनाधीनता

व्यसनाधीनता

व्यसनाधीनता

व्यसनाधीनता – एक मानसिक आजार

सध्या जगामध्ये मृत्युच्या कारणांमध्ये व्यसन हे चौथ्या क्रमांकावर आहे.जगभरात दरवर्षी ८ ते १० लाख लोक फक्त तंबाकूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात.आजकाल पुरुष व तरुणांबरोबरच स्त्रिया व मुले यांच्यामध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे.
व्यसनांच्या पदार्थांमध्ये मुख्यतः तंबाखू, दारू तसेच चरस,गांजा,अफू,झोपेच्या गोळ्या किंवा इतर मादक पदार्थ असू शकतात.अलीकडेच इंटरानेट व स्मार्टफोनचीही व्यसनाधीनता होऊ शकते असे म्हटले जातेय.
प्रश्न :- आपण बर्याच गोष्टी वापरतो खातो ,पितो मग ठराविक गोष्टींचेच व्यसन का होते?
उत्तर :- माणसांच्या मेंदूला चटक लावण्याचा एक गुणधर्म अशा पदार्थांमध्ये असतो. हे पदार्थ घेतल्यानंतर मेंदूमध्ये काही विशिष्ट रसायनांचा स्त्राव वाढतो ज्यास शास्त्रीय भाषेत इंडोजिनस ओपियोईडस म्हणतात ज्यामुळे मनामध्ये सुखकारक भावना निर्माण होते (ज्याला आपण किक बसते असे म्हणतो). आपल्या मेंदूमध्ये रिवार्ड सिस्टीम असते ज्यामुळे आपल्याला सुख देणारी किंवा आनंद देणारी गोष्ट परत परत करण्याचा मोह होतो.
बऱ्याच वेळा व्यसनांची सुरुवात कुतूहल किंवा उत्सुकतेपोटी किंवा मित्रांच्या दबावामुळे,व्यवसायाची गरज म्हणून तर कधी तणाव कमी करण्यासाठी तर कधी आनंद साजरा करण्यासाठी केली जाते.परंतु यातील सर्वच जण व्यसनाधीन होतील असेच नाही.फक्त १५-२०टक्के लोकांना व्यासानाधीनातेचा आजार होतो.
प्रश्न:- व्यसन करणाऱ्या प्रत्येकालाच व्यसनाधीनतेचा आजार होत नाही मग तो ठराविक लोकांनाच का होतो?
उत्तर :- प्रत्येकाची जैविक/शारीरिक , मानसिक व सामाजिक जडण घडण वेगवेगळी असते. व त्याप्रकारेच व्यसनाधीनतेच्या कारणांची विभागणी केली जाते.
जैविक कारणामध्ये अनुवांशिकता मुख्य कारण असते. पालक किंवा जवळच्या नातेवाईकास व्यसनाचा आजर असेल तर, किंवा ज्या व्यक्तीमध्ये व्यसनाचे पदार्थ पचवण्याची क्षमता जास्त असते त्यांना व्यसन लागण्याचे प्रमाण जास्त असते.
मानसिक कारणांमध्ये मानसिक आजार व स्वभावातील दोष हि दोन मुख्य कारणे आहेत. चिंता किवा नैराश्याच्या आजारामध्ये चिंता व उदासीनता कमी करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी व्यसन केले जाऊ शकते. समाज विरोधी स्वभाव गुण , अतिधाडसीपणा, कमीपणाची भावना असलेल्यांमध्ये व्यसनांचा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
सामाजिक कारणांमध्ये  पदार्थांची सहज उपलब्धता,सामाजिक प्रतिष्ठा व मान्यता तसेच राजकीय पाठबळ हि मुख्य करणे होय.
प्रश्न:-एखाद्या व्यक्तीला व्यसनाधीनतेचा आजार होतोय किंवा झाला आहे हे कसे ओळखायचे?
उत्तर:-त्यांच्यामध्ये खालील लक्षणे दिसून येतात:
१ व्यसनाचा पदार्थ सतत घेण्याची इच्छा तीव्र होते.दिवसाचा जास्तीत जास्त वेळ व्यसन करण्यात किंवा त्याबद्दल विचार करण्यात घालवला जातो.
२ पूर्वी एवढीच नशा चढण्यासाठी जास्त प्रमाणात व्यसनाचा पदार्थ घ्यावा लागतो, पहिल्यापेक्षा ती किक/नशा जास्त वेळ टिकत नाही, व्यक्ती जास्त प्रमाणात व जास्त कालावधीसाठी सतत करत राहतो.
३ व्यसनाचा पदार्थ घेणे बंद केल्यास शारीरिक व मानसिक त्रास होतो व व्यसन केल्यानंतर तो त्रास कमी होतो. यास वियोग लक्षणे ( withdrawl symptoms ) असे म्हणतात.
४ शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व आर्थिक समस्या निर्माण होत आहेत,याची जाणीव असूनही व्यसन सोडता येत नाही. व्यसन सोडण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी होतात.
5. व्यसनामुळे स्वतःसाठी,काम,कुटुंब व समाजीक संबंध यासाठी वेळ देऊ शकत नाही.

प्रश्न:-व्यसनामुळे काय काय परिणाम होतात?
उत्तर:-  व्यसनामुळे रुग्णांचे आर्थिक,कौटुंबिक,सामाजिक व शारीरिक नुकसान होते.
आर्थिक:- कामावर जात नसल्यामुळे अर्थिक कमाई कमी होते किंवा बंद होते. व्यसनावरील खर्च  तसेच शारीरिक आजारावरील औषधोपचारांचा खर्च यामुळे अर्थिक अडचण निर्माण होते.
कौटुंबिक:-पत्नी सोबत वाद होतात , घरच्यांना त्रास होतो ,लहान मुलांवर दुष्परिणाम होतात व एकंदरीतच घरातील वातावरण खराब होऊन स्थैर्य हरवते.
सामाजिक:- दारुडा/बेवडा म्हणतात. व्यक्तीची व कुटुंबाची  सामाजिक प्रतिष्ठा ढासळते.
शारीरिक:- व्यसनाचा पदार्थ कुठला आहे त्याप्रमाणे त्याचे परिणाम दिसून येतात.
तंबाखू मुळे तोंडाचे अल्सर, कॅन्सर, फुफुसाचे व घशाचे कॅन्सर,  होतात . उच्चरक्तदाब व हृदय विकार अशा शारिरीक आजारांची शक्यता वाढते. अताठरता, नंपुसकता, शीघ्रपतन अशा अनेक प्रकारच्या लैंगिक समस्या निर्माण होतात.
दारूमुळे पोटाचा कॅन्सर, लिव्हर निकामी होणे, हात पायाला मुंग्या येणे, विस्मृती होणे, लैंगिक समस्या ( अताठरता, नंपुसकता, लैंगिक इच्छा कमी होते) निर्माण होतात. विविध  मानसिक आजार होऊ शकतात. काहीना फिटस ही येऊ शकतात.

प्रश्न:-व्यासानाधीनातेचा उपचार कसा केला जातो?
उत्तर:व्यासानाधीनातेच्या उपचारासाठी औषधोपचार व मानसोपचार या दोन्ही पातळींवर प्रयत्न करणे गरजेचे असते. तीव्रता जास्त असल्यास अडमिट करून औषधोपचार करणे गरजेचे असते. औषधोपचारामध्ये मुख्यतः चार प्रकारची औषधे वापरली जातात.
१ पहिल्या प्रकारात व्यसन बंद केल्यास येणाऱ्या वियोग लक्षणांची तीव्रता कमी करणारी औषधे येतात. व्यसन बंद केल्यानंतर होणारा त्रास कमी झाल्यामुळे जे रुग्ण त्रास होतो म्हणून व्यसन करतात त्यांना मदत होते. ही औषधे व्यसन मुक्तीच्या पहिल्या पाच ते दहा दिवसांमध्ये वापरली जातात.
२ दुसर्‍या प्रकारामध्ये इच्छा होऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये मुख्यतः अकामप्रोसेट, टोपिरामेट, नालट्रीकझोन,अशी औषधे येतात.
३ तिसऱ्या प्रकारात दारू विरोधी औषधे येतात. यामध्ये एस्पिराल या नावाचे औषध दिल्यानंतर जर रुग्ण दारू प्यायला तर उलट्या होणे, जीव घाबरणे, घाम फुटणे तर कधी कधी ब्लडप्रेशर वाढणे, धडधड होणे व बेशुद्ध पडण्याइतपत त्रीव्र REACTION येऊ शकते. या होणाऱ्या REACTION मुळे  भीती मुळे पेशंट दारू पिणे टाळतो.
४ चौथ्या प्रकारच्या औषधांमध्ये व्यसनामुळे शरीराची हानी भरून काढायला मदत करणारी औषधे येतात. लिवर टोनिक, व्हीटामिनाच्या गोळ्या किंवा इंजेक्शन प्रामुख्याने वापरली जातात.

फक्त औषधामुळे रुग्ण बरा होत नाही तर व्यसन बंद होण्यासाठी मानसोपचार द्वारे व्यक्तीमत्वात आणि विचारांत आमुलाग्र बदल घडून आणणे महत्वाचे असते. मानासोपाचारामध्ये मुख्यतः वैयक्तिक समुपदेशन व समूह समुपदेशन याचा वापर केला जातो.
वैयक्तिक समुपादेशनात रुग्णाची  पूर्ण माहिती घेऊन व मानसिक तपासणी करून व्यसनाच्या मुळाशी असलेली कारणे, स्वभाव दोष दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यसनाधीन रुग्ण मुख्यतः नकार, प्रक्षेपण, तर्कसंगती करणे या मुख्य आरोग्य संरक्षण पद्धती वापरत असतो. नकार म्हणजे आपण व्यसन करतो किंवा व्यसनामुळे आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होत आहेत हे मान्य करत नाहीत. त्याची जबाबदारी स्वीकारत नाहीत. आयुष्यात सर्वच गोष्टीत अयशस्वी होत असूननाहि ते तो पराभव मान्य करीत नाहीत. कारण प्रत्यक्ष पराभवापेक्षा पराभव मान्य करणे त्यांना अवघड वाटते.  त्यामुळे मानसोपचारात  रुग्णांना सत्यपारीस्थितीची जाणीव करून दिली जाते व जबाबदारी स्वीकारायला शिकवली जाते.
तर्कसंगती करणे  म्हणजे ते रुग्ण व्यसनामुळे समस्या निर्माण होतात हे मान्य करतात परंतु ती त्याला काही न काही कारणे देण्याचा प्रयत्न करतात. उदा.व्यवसायाचा भाग म्हणून घ्यावीच लागते, आमचे कामच असे आहे, ताणतणावामुळे पितो अशी कारणे समोर मांडली जातात. त्यामुळे मानसोपचारात  ते जी कारणे सांगत आहेत ते कसे खोटे आहे ते सांगितले जाते व कारणे हाताळण्याचे इतर मार्ग दाखवले जातात.
प्रक्षेपण म्हणजे व्यक्ती व्यसनांसाठी स्वतःऐवजी इतरांना जबाबदार ठरवतात. उदा. बॉस त्रास देतो,बायको किरकिर करते किंवा आईवडील लक्ष देत नाहीत. अशा रुग्णांना मानसोपचारात  आपण दारू पिण्यासाठी स्वतःच्या मनाची कशी फसवणूक करतोय हे दाखवले जाते. तसेच स्वतःला जबाबदारी घ्यायला शिकवले जाते.
समूह उपदेशान व्यसन हा आजार कसा आहे; त्याचे परिणाम काय होतात,  व्यसन मुक्तीची सूत्रे, इच्छा झाल्यास काय करावे अशा गोष्टींवर मार्गदर्शन किंवा चर्चा केली जाते. व्यसनातून बाहेर पडलेल्या व्यक्ती अनुभव कथन करतात.व्यसनामुळे आपले कसे नुकसान झाले, व्यसन कसे बंद केले व व्यसन बंद केल्यानंतर आपले आयुष्य कसे सुधारले हे ते सांगतात.

प्रश्न:-व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबियांस किंवा नातेवाईकांनी काय करायला हवे ?
उत्तर:- व्यसनाचा उपचार हि दीर्घकाळ चालणारी व चिकाटीने करावी लागणारी प्रक्रिया आहे. सुरवातीस अपयश आले तरी निराश न होता व्यसनाधीन व्यक्ती, त्यांचे नातेवाईक, मित्र व मनोविकार तज्ञ या सर्वांनी मिळून प्रयत्न चालु ठेवणे गरजेचे असते. योग्य व तज्ञांकडून उपचारानंतर एका वर्षाच्या शेवटी साधारणतः ४०% ते ५०% टक्के रुग्ण व्यसनमुक्त होतात. तर इतरांमध्ये प्रमाण कमी होते. अनेक वेळा उपयश आल्याने निराश झालेले कुटुंबीय वर्तमानपत्रातील दारू सोडवण्याच्या गोळ्याच्या जाहिरातीला बळी पडतात. न सांगता दारू सोडवा, पंधराच दिवसात दारू सोडवा किंवा बाबाजीची दारू सोडवायची पावडर ही फक्त  तुमच्या हताशपनाचा गैरफायदा घेण्याचा हा प्रकार असतो. जाहिरात करणारे बरेच वेळा यापूर्वी उल्लेख केलेला डायसल्फिराम हि गोळी/पावडर देतात. अनेक वेळा हि गोळी नातेवाईक रुग्णांना न सांगता देतात यामुळे अनेक वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये काहीवेळी रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे तज्ञांना दाखवूनच सर्वांगीण उपचार करणे महत्त्वाचे असते.

प्रश्न:-व्यसन करणाऱ्या व्यक्तीस तुम्ही काय सल्ला द्याल?
उत्तर:- व्यसन करताना आजचा एक दिवस हि गोष्ट लक्षात ठेवायची. “आयुष्यभर व्यसन करणार नाही” असे म्हणण्या ऐवजी “ मी आजचा एक दिवस व्यसन करणार नाही” असे म्हणायचे. यामुळे तुमचे व्यसनावर नियंत्रण आहे हा फाजील आत्मविश्वास कमी होतो.
सकाळी उठल्यावर देवाची प्रार्थना करायची “देवा आजच्या दिवसात व्यसनापासून दूर राहण्याची मला शक्ती दे व डोक्याला कितीही त्रास झाला तरी व्यसन करायचे नाही व रात्री झोपताना आजचा दिवस व्यसनापासून दूर ठेवल्याबद्दल देवाचे आभार मानायचे. राग घालवण्यासाठी, दुःख विसरण्यासाठी कधीही व्यसन करू नका व्यसनामुळे कधीही समस्या सुटत नाहीत. तणाव कमी करण्यासाठी किंवा झोप येण्यासाठी व्यसन करू नका कारण तात्पुरता फायदा होऊनहि शरीराचा तणाव व झोपेच्या समस्या वाढत जातात. आनंद साजरा करण्यासाठी व्यसन केल्याने तात्पुरता आनंद मिळाला तरी आयुष्यभाराचे दुःख तुमच्या व कुटुंबियांच्या वाट्याला येऊ शकते हे लक्षात ठेवा.
व्यसनमुक्तीसाठी आजच निर्धार करा व मनोविकार तज्ञांकडून सर्वांगीण उपचार घेऊन व्यसनमुक्त व्हा.

 

 

१ व्यसनाचा पदार्थ वारंवार घेण्याची तीव्र इच्छा होणे.

२ पूर्वी इतकी नशा चढण्यासाठी जास्त प्रमाणात व्यसनाचा पदार्थ घेण्याची गरज पडणे किवा पूर्वीच्या मात्रेत कमी नशा जाणवणे.

३ व्यसनाचा पदार्थ घेणे बंद केल्यावर शारीरिक किवा मानसिक त्रास जाणवणे व व्यसन जास्त प्रमाणात व जास्त कालावधीसाठी सतत करत राहणे.

४ दिवसाचा अधिकाधिक वेळ व्यसन करण्यासाठी किवा त्याच्याशी सबंधित कामामध्ये किंवा ते कसे व कसे करता येईल या विचारामध्ये जाणे.

५ व्यसनामुळे करमणूक, छंद, सामाजिक सबंध, काम, कुटुंब यांना वेळ न देऊ शकणे.

६ शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याची जाणीव होऊनही व्यसनापासून दूर न राहता येणे.

Copyright © 2022 Mindcare Hospital, Ratnagiri.