एखाद्या गोष्टीची, वस्तूची, परिस्थितीची भीती किवा काळजी वाटणे साहजिकच आहे. आपणास धोक्याची जाणीव करून देणे व त्याची पूर्व काळजी घेणे  यासाठी भीती /काळजी वाटणे गरजेचे असते. परंतु हे जर अतिप्रमाणात सतत व तीव्र व विनाकारण होत असेल तर तो आजार ठरतो.

१.काळजी किवा भीती सतत अतिप्रमाणात तीव्र व विनाकारण किंवा अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात असेल तर.

२.बैचेनी लक्ष न लागणे, घाम फुटणे, कंप सुटणे, किवा इतर भीतीची शारीरिक लक्षणे दिसून येत असतील तर.

३.सतत तेच विचार येत राहणे, झोपेच्या समस्या निर्माण होणे. ४.भीतीमुळे त्या वस्तू, परिस्थिती टाळत असेल तर.

५.त्याचा त्याच्या दैनंदिन, व्यवसायिक, सामाजिक व नाते संबंधावर परिणाम होत असेल तर .

भीतीची / काळजीची  शारीरिक  लक्षणे  कुठली ?

१. धडधड  होणे , हृदयाचे  ठोके  वाढणे.

२. बैचेनी  वाटणे , सततची  हालचाल  करणे , फेऱ्या  मारणे.

३. हात-पायाला  मुंग्या  येणे.

४. कंप  सुटणे  थरथर  कापणे .

५. डोके  दुखणे .

६. चक्कर  आल्यासारखे  वाटणे / भिरभिरणे .

७. पित्ताचा त्रास  जाणवणे, पोट  दुखणे,  जळजळ  होणे, उलटी  होणे, जुलाब  होणे, पोटात गॅॅस  होणे, गुडगुड आवाज  होणे

८. सतत  व  जोराची  लघवी होणे .

काळजीच्या आजाराचे विविध प्रकार

१. सर्वसाधारण काळजीचा आजार (Generalized Anxiety Disorder)

२.  भीतीचे झटके (Panic Disorder)

३. सामाजिक भीतीचा आजार  (Social Phobia)

४. भयगंड (Specific Phobia)

५. क्लेशकारक घटनेपश्चात तणाव आजार  (Post Traumatic Stress Disorder )

सर्वसाधारण काळजीचा आजार

  1. दैनंदिन गोष्टी  किवा  भविष्यातील  अनेक  छोट्या  छोट्या  गोष्टींबद्धल  सतत  व  जास्त  प्रमाणात  वाटणारी   काळजी  किवा  भीती . अशी  काळजी  ६  महिन्यापेक्षा  जास्त  दिवस  वाटणे .
  2. या काळजीला  किंवा  विचारांना  कंट्रोल  न  करू  शकणे / काबूत  न  ठेवू  शकणे .
  3. त्यामुळे बैचेनी  , सततचा  थकवा , लक्ष  न  लागणे , चिडचिड  होणे , डोके  दुखी , शरीरात  स्नायूत  तणाव  जाणवणे , झोपेच्या  तक्रारी . यांपैकी  ३  किवा  अधिक  लक्षणे  दिसून  येतात.
  4. याचा रुग्णास  त्रास  होऊन  त्याचा  त्याच्या  दैनंदिन, सामाजिक , व्यवसायिक  जीवनावर  परिणाम  दिसून  येतो .

 

 

भयगंड

१. एखाद्या  ठराविक  वस्तूची , परिस्थितीची  अपेक्षेपेक्षा  जास्त , विनाकारण , सतत  व  तीव्र  स्वरुपाची  भीती वाटणे. उदा . जनावरे  (साप , कुत्रा  ई..)उंचीच्या  किंवा बंद  जागा  इंजेक्शन, रक्त  ई .

२. अशा  वस्तू  किंवा  परिस्थिती  समोर  येताच  किंवा   समोर  येईल  या  विचाराने  भीतीची  लक्षणे  जसे  कि  बैचेनी , घाम  फुटणे , कंप  फुटणे , अशी  लक्षणे  चालू  होतात .

३. अशामुळे  व्यक्ती  ती  वस्तू  किंवा  परिस्थिती  टाळायचा  प्रयत्न  करते .

४. याचा  रुग्णास  त्रास  होऊन  त्याचा  त्याच्या  दैनंदिन , सामाजिक , व्यवसायिक  जीवनावर  परिणाम  दिसून  येतो .

भीतीचे  झटके

अचानकपणे व सतत येणारे तीव्र भीतीचे झटके ज्यावेळी खालीलपैकी कुठलीही  ४ लक्षणे दिसून येऊ शकतात.

  1. धडधड होणे
  2. घाम फुटणे
  3. थरथर कापणे
  4. श्वास घ्यायला त्रास होणे / दम / धाप लागणे / दम कोंडणे
  5. छातीत दुखणे
  6. हात-पायाला मुंग्या येणे
  7. बैचेन वाटणे, पोटात त्रास होणे
  8. मळमळ होणे
  9. मला काही तरी होईल, माझा जीव जाईल असे वाटणे.

असे झटके आल्यानंतर साधारण १५ ते ३० मिनिटे त्रास होतो  व नंतर आपोआप त्रास कमी होतो.

बऱ्याच वेळा अशा रुग्णास लगेचच जनरल फ़िजिशिअन कडे दाखवले जाते. तपासणी मध्ये सर्व नॉर्मल आढळून येते.  छातीची पट्टी (ECG), प्रेशर (blood  pressure) नॉर्मल  असल्याचे डॉक्टर सांगतात. सततची लक्षणे  हृदयाचे झटके (HEART  ATTACK) शी मिळते जुळते असल्याने हार्ट अटॅक असल्यासारखे  वाटते . व त्यांना उच्च रक्तदाब किंवा हार्ट अटॅक समजून उपचारही केला जातो व मग त्या गोळ्या आयुष्यभर रुग्णाला विनाकारण घ्याव्या लागतात. जर अशी लक्षणे सतत दिसून येत असतील सर्व तपासण्या विशेषतः ECG प्रेशर नॉर्मल असल्यास हा हृदयाचा झटका नसून तीव्र भीतीच्या झटक्याचा आजार आहे असे समजून मनोविकार तज्ञाला दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे गरजेचे असते.

सामाजिक भीती / Social Phobia

१. समाजामध्ये वागण्या / बोलण्यावरून किवा एखादी कृती  करण्या बाबत  सतत व जास्त प्रमाणात वाटणारी भीती अशावेळी लोक आपल्याला चुकीच्या पद्धतीने पाहतील किंवा उणे दुणे काढतील असे वाटणे. उदा .लोकांसमोर बोलणे,भाषण देणे,लोकांसमोर जेवणे, पाणी पिणे, किंवा एखादी ठराविक कृती करणे, लोकांशी  बोलणे

२. लोक  आपला  अपमान  करतील / लज्जास्पद  काहीतरी  घडेल  अशी  नेहमी  विनाकारण  व  जास्तीची  भीती  वाटणे

३. या  भीतीमुळे  तो  अशा  गोष्टी  टाळतो  किंवा यावेळी  या  गोष्टी  करेल  त्यावेळी  घाम  फुटणे , कापणे , पोटाचा  त्रास  होणे ,बैचेनी  अशी  काळजीची / भीतीची  लक्षणे  दिसून  येतात.

घटनेपश्चात क्लेशकारक तणाव आजार

ज्यावेळी व्यक्ती एखाद्या अशा मोठ्या अपघातास किंवा मानसिक आघातास सामोरी जाते जिथे त्याच्या स्वतःच्या किंवा त्याच्या समोर एखाद्याच्या जीवास धोका असू शकला असता किंवा झाला असेल व त्यावेळी त्याच्या मनामध्ये खूप तीव्र प्रकारची भीती निर्माण झाली असेल.(उदा . बॉम्बस्फोट , भूकंप ,बलात्कार ,अपघात  इ). त्यानंतर 4 आठवड्याच्या आत खालील लक्षणास सुरवात होते.

  1. भावनिक प्रतिसाद कमी होणे,संवेदनाशून्य/बधीर होणे. आजूबाजूच्या वातावरणाचे भान न राहणे. स्वतःचे भान न राहणे.
  2. सतत त्या घटनेबद्दल विचार मनात येणे, समोर चित्र उभे राहणे,स्वप्नात त्या गोष्टी दिसणे किंवा तसे होतेय असा भास होणे,अनुभव येणे.
  3. त्या घटनेची आठवण करून देणाऱ्या गोष्टी,व्यक्ती किंवा वस्तुंना टाळायचा प्रयत्न करणे.
  4. झोप न लागणे,चिडचिड होणे,बैचेनी वाटणे,लक्ष कमी होणे.